यमुनानगर (हरियाणा) - पंजाब राज्यातून घरी परतण्यासाठी आलेल्या मजुरांनी यमुनानगर जिल्ह्यातील करेडा खुर्द येथे गोंधळ घातला. राष्ट्रीय महामार्गावर येऊन मजुरांनी गावी जाण्यासाठी रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी मजुरांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मजुरांनी त्यांची महामार्ग रिकामा न केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.
यमुनानगर जिल्हा प्रशासनाने पंजाब आणि चंदीगढ येथून येणाऱ्या मजुरांच्या मुक्कामाची व्यवस्था सरकारी शाळांमध्ये केली आहे. येथून मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात येते. स्थलांतरित मजुरांनी त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत, असे सांगितले. आम्हाला लवकर घरी परत जायचे आहे पण लॉकडाऊन आहे, त्यामुळे जाता येता नाही म्हणून महामार्ग अडवला असल्याचे मजुराने सांगितले.
लॉकडाऊनमुळे सर्वांना घरी परत जायचे असल्याने छोट्या- मोठ्या वादावादीच्या घटना घडत आहेत, असे पोलीस अधीक्षक हिमांशू गर्ग यांनी सांगितले. स्थलांतरित मजुरांची समजूत काढून त्यांना निवारागृहात पाठवण्यात आले आहेत.