कानपूर - कुख्यात गुंड विकास दुबेने पोलिसांवर केलेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले होते. त्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी विकास दुबेचे कानपूर जिल्ह्यातील बिकारू गावातील घरावर तोडक कारवाई केली होती. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये घर पाडले नसल्याचा दावा केला आहे.
३ जुलैच्या रात्री विकास दुबेला एका गुन्ह्यात अटक करण्यास गेलेल्या पोलीस पथकावर दुबे आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता. यात आठ पोलीस ठार झाले. त्यानंतर विकास दुबे फरार झाला. मात्र, त्यानंतर पोलिसांनी विकास दुबेचे घर पाडले. मात्र, आता पोलिसांनी घर पाडले नसल्याचा दावा केला आहे.
विकास दुबेने घरात लपवलेली शस्त्रास्त्रे जप्त करतेवेळी घराचा काही भाग कोसळल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दुबेने घराच्या भिंती, छत आणि कॉलमच्या पोकळीत शस्त्रास्त्रे लपवून ठेवली होती. ही शस्त्रास्त्रे जप्त करताना खोदकाम करावे लागले होते. तसेच शस्त्रे भिंती आणि छतात ठेवल्याने घराची मजबूती कमी झाल्याने घर धोकादायक बनले होते. कारवाई करतेवेळी जेसीबीचा वापर करण्यात आल्याने घराचा काही भाग कोसळला, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर विकास दुबे साथीदारांसह पळून गेला होता. आठ दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. शेवटी मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरातून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. तेथून कानपूरला आणत असताना पोलिसांच्या एका गाडीचा अपघात झाला. या संधीचा फायदा घेऊन विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांचे शस्त्र हिसकाऊन घेत त्याने गोळीबारही केला होता. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात विकास दुबे ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. ही चकमक बनावट असल्याचा आरोप उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्य सरकारवर झाला होता.