नवी दिल्ली - लॉकडाऊनच्या भवितव्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा पार पडणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची मुदत १४ एप्रिलपर्यंत आहे. त्यानंतर हा लॉकडाऊन उठवायचा, सुरू ठेवायचा की, शिथील करायचा याबाबत उद्याच्या बैठकीमध्ये चर्चा होईल. याआधी बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या कल्पनेला सहमती दर्शवली आहे.
यासंदर्भात बुधवारी पंतप्रधानांनी संसदेच्या नेत्यांसोबतही चर्चा केली होती. यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले होते, की लॉकडाऊन काढण्याचा निर्णय जरी घेण्यात आला, तरी तो पूर्णपणे काढून न घेता टप्प्या टप्प्याने काढून घेण्यात येईल. यानंतर कित्येक मुख्यमंत्र्यांनी, जिल्हा प्रशासनांनी आणि तज्ज्ञांनीही लॉकडाऊन वाढवण्याबद्दल सुचवले आहे. तसेच, ओडिशाने याबाबत निर्णय घेत, राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवलाही आहे.
दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६,४१२ झाली आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी ५,७०९ रुग्ण हे अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे ५०४ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, देशातील एकूण बळींचा आकडा १९९ वर पोहोचला आहे.
हेही वाचा : कोरोना इफेक्ट : नागालँडमध्ये १०९ कैद्यांची मुक्तता..