नवी दिल्ली - श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक हैदराबाद हाऊस येथे पार पडली. बैठकीत दोन्ही देशांत असलेल्या सबंधांबाबत चर्चा झाली. मैत्रीपाला सिरिसेना यांनी यावेळी ९ जून रोजी होणाऱ्या मोदींच्या दौऱ्याला दुजोरा दिला आहे.
मोदी सरकारने दिलेल्या निमंत्रणानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना शपथविधी सोहळ्यासाठी आले होते. सोहळा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नरेंद्र मोदी आणि मैत्रीपाला सिरिसेना यांच्यात बैठक झाली. सिरिसेना म्हणाले, सार्क आणि बिम्सटेक दोन्ही क्षेत्रीय सहयोगासाठी महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे बिम्सटेकला सार्कचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. दोन्ही आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत.
श्रीलंका दौऱ्याआधी नरेंद्र मोदी २ दिवसीय मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत. मालदीव येथे दोन्ही देशातील राजकीय सबंधावर चर्चा होणार आहे. यादरम्यान, मोदी मालदीवच्या संसदेलाही भेट देणार आहेत.