नवी दिल्ली - आठ नोव्हेंबरचा दिवस देशाच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री आठ वाजता दूरदर्शनवरून देशाला संबोधित केले होते. या दिवशी मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. सरकारने देशातील काळा पैसा आणि नकली नोटांची समस्या संपवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले.
नोटबंदीचा निर्णय त्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून लागू झाला होता. यामुळे काही दिवस देशामध्ये गोंधळाचे वातावरण होते. बँकांच्या बाहेर लांबच-लांब रांगा लागलेल्या होत्या. यानंतर 500 आणि 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. काही दिवसांनी 200, 100, 50 आणि 10 रुपयांच्याही नव्या नोटा जारी झाल्या. मात्र, 100, 50 आणि 10 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द झाल्या नाहीत.