हैदराबाद - तेलंगणा येथे झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्यावर हल्ला चढवला. तसेच, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीडीपी या महाआघाडीतल्या सर्वच पक्षांना मोदींनी फटकारले आहे. तसेच, त्यांनी काँग्रेसने ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्याचे उत्तर द्यावे, असे म्हटले आहे.
'ओमर अब्दुल्ला घड्याळाचे काटे मागे फिरवू पहात आहेत. मात्र, भाजप हे कदापिही स्वीकारणार नाही,' असे मोदींनी म्हटले आहे. ओमर अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या एका भाषणात 'जम्मू काश्मीरमध्ये वेगळे संविधान, राष्ट्रपती, पंतप्रधान येतील,' असे म्हटले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १९६५ पर्यंत काश्मीरमध्ये सरदार-ए-रियासत (राष्ट्रपती), वजीर-ए-आझम (पंतप्रधान) होते. त्यानंतर हे व्यवस्था मोडीत काढून तेथे राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणण्यात आले.
'काँग्रेस हा महाआघाडीतला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांनी यावर स्वतःची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. शिवाय, ममता बॅनर्जी, शरद पवार, यू-टर्नसाठी प्रसिद्ध असलेले चंद्राबाबू नायडू हेही अनेक वर्षांपासून नेते आहेत. त्यांनीही स्वतःची भूमिका जनतेसमोर मांडावी,'असे मोदींनी म्हटले आहे.
'जम्मू, काश्मीर, लडाख येथे स्वतःचे बलिदान करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, काश्मीरचा सौदा कधीही मान्य केला जाणार नाही,' असे मोदी म्हणाले.