नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(गुरुवार) जपानचे मावळते पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी फोनवर चर्चा केली. भारत-जपान संबंध मजबूत करण्यासाठी आबे यांच्या नेतृत्त्वाचे आणि वैयक्तिक कटिबद्धतेबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले. मागील काही वर्षात भारत-जपान संबंध सुधारल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटले, तसेच भविष्यातही दोन्ही देशातील संबंध घनिष्ठ राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
आरोग्याचे कारण देत शिंजो आबे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी आता नव्या पंतप्रधान निवडीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांच्यात चर्चा झाल्याचे ट्विट परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
आबे यांच्या कार्यकाळात भारत जपान संबध सुधारल्याचे मोदी म्हणाले. त्यांच्या नेतृत्वगुणाचे कौतुक करत मोदींनी आभार मानले. जपान आणि भारताच्या लष्करात रसद पुरवठा सहकार्य करार झाला असून याचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.
लष्कराच्या या करारामुळे भारत जपानमधील संरक्षण क्षेत्रातील संबंध आणखी मजबूत होतील, आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. अनेक वर्षांच्या चर्चेनंतर भारत जपानमध्ये लष्करी रसद पुरवठा करण्यासंबंधीच्या करारावर सह्या करण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही देश आता एकमेकांचे लष्करी तळ सरद सहकार्यासाठी वापरू शकतात.
आशिया पॅसिफिकमधील बदलती भू-राजकीय परिस्थिती
आशिया खंडामध्ये चीनने अमेरिकेला आव्हान देत वर्चस्व गाजविण्याासाठी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. कोरोना संकट, दक्षिण चिनी समुद्र, जपान-चीन सेक्याक्यू बेटांचा प्रश्न आणि चीन विरोधातील आघाडी, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. अशा स्थितीत जपानमध्ये नेतृत्व बदल होत आहे. चीन विरोधात भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा 'क्वाड' गट तयार होत आहे. त्यामुळे आशियाला पूर्वीपेक्षा सर्वात जास्त महत्व आले आहे. ७० टक्के समुद्री व्यापार आशिया पॅसिफिक खंडातून होतो. अशा बदलत्या भू राजकीय परिस्थितीत भारत जपान संबंध सुधारत आहेत.