नवी दिल्ली - 'एक देश, एक निवडणूक' संकल्पनेवर चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक संसदेत सुरू झाली आहे. याच बैठकीत नितीन आयोगाच्या महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांच्या विकासाविषयक प्रस्तावावर देखील चर्चा होणार आहे. नुकताच बीजेडी अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 'एक देश, एक निवडणूक' या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला आहे.
काँग्रेस मित्रपक्ष राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार, जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला, शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर सिंह बादल, बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक, पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या मेहबूबा मुफ्ती, वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बैठकीत सहभाग घेतला आहे.
काँग्रेससह संपुआतील काही पक्षांचा विरोध
काँग्रेस प्रणित संपुआ, तृणमूल काँग्रेस यांनी या संकल्पनेला विरोध केला आहे. लोकसभेसाठी नेमण्यात आलेले काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी पत्रकारांना माहिती दिली. संपुआ अध्यक्ष सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या संकल्पनेला विरोध करण्यात आला. यासंदर्भात आणखी एक बैठक घेतली जाईल, असे चौधरी म्हणाले.
संपुआमधील काँग्रेसनंतर दुसऱया क्रमांकाचा मोठा पक्ष डीएमके आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लीम लीग (IUML) हे बैठकीला उपस्थित होते. संपुआमधील सोनिया गांधी, राहुल गांधी, अधिर रंजन चौधरी, के. सुरेश (सर्व काँग्रेस); टी. आर. बालू, कनिमोझी (डीएमके), सुप्रिया सुळे (एनसीपी), फारूख अब्दुल्ला (एनसी), तिरुमावलन तोल (व्हीसीके), एन. के. प्रेमचंदन (आरएसपी), पी. के. कुन्हालीकुट्टी (IUML), थॉमस चाझिकडन (केसी एम) हे बैठकीला उपस्थित होते.
काँग्रेसचे प्रवक्ते गौरव गोगोई यांनी ईव्हीएमसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचा आरोप केला आहे.