हैदराबाद - अयोध्येत 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मात्र, भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी जाणे म्हणजे त्यांनी राज्यघटनेच्या घेतलेल्या शपथेचे उल्लंघन आहे, असे एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी म्हटले आहे. धर्मनिरपेक्षता राज्यघटनेचा मुलभूत पाया आहे. याचे उल्लंघन पंतप्रधान मोदींकडून होईल, असे औवेसी म्हणाले.
असदुद्दीन औवेसी यांनी यासंबंधी एक ट्विट केले आहे. ‘पंतप्रधान पदावर असताना भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला जाणे, हे पंतप्रधानांनी घेतलेल्या शपथेच्या विरोधात आहे. धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा मूळ गाभा आहे. 400 वर्षांपासून बाबरी मशिद अयोध्येत उभी होती, अन गुन्हेगारी वृत्तीच्या टोऴक्याने 1992 साली मशिद पाडली, हे आपण विसरू शकत नाही’, असे ट्विट औवेसी यांनी केले आहे.
राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येत जाण्याचे प्रस्तावित आहे. मंदिराचा पाया बांधताना खाली 40 किलो चांदीचा स्लॅब( ठोकळा) टाकण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. वाराणसीच्या पुजाऱ्यांकरवी भूमीपूजन करण्यात येणार आहे. 5 ऑगस्टला दुपारी 12 वाजून 13 मीनिटांनी शुभ मुहुर्तावर भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्याचे प्रस्तावित आहे. मंदिराचे बांधकाम 85 हजार स्केअर फूट जागेवर होणार आहे. संपुर्णा ब्रदर्स यांच्याकडून मंदिराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यांच्यानुसार मंदिरात 50 हजार भाविक एकावेळी बसू शकणार असून भव्य हिंदू मंदिरामध्ये राम मंदिर गणले जाईल.