पाटणा(भागलपूर) - पंतप्रधान मोदी बिहार विधासनभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात आले असून त्यांनी आज तीन जिल्ह्यात सभा घेतल्या. यावेळी त्यांनी 'लोकल फॉर व्होकल' या अभियानाचा नारा दिला. सणासुदीच्या काळात देशी बनावटीचा माल खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच स्थानिक बिहारी भाषेत जनतेशी संवाद साधला.
आत्मनिर्भर बिहारचा नारा
पंतप्रधान मोदी म्हणाले, सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक माल खरेदी करावा. देशी बनावटीची मातीची भांडी, दिवे, खेळणी खरेदी करा. भागलपूरची सिल्क साडी, मंजूसा पेंटिंग अशा स्थानिक उत्पादनांसह अनेक वस्तूंचा त्यांनी उल्लेख केला. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर बिहार आत्मनिर्भर बनेल, असे मोदी म्हणाले.
बिहार आत्मनिर्भरतेचा संकल्प घेवून प्रगती करत आहे. मात्र, जर यात अडथळ आला तर विकासाची गती कमी होईल. त्यामुळे नितीश कुमारांच्या नेतृत्वाखील एनडीए सरकारला निवडून द्या, असे मोदी म्हणाले.
२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल. पहिल्या टप्प्यात २८ नोव्हेंबरला ७१ विधानसभा जागांसाठी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी आणि शेवटच्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत, राजद काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजपा आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.