नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ आज सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे संयुक्तपणे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटन कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केला जाईल. यावेळी मॉरिशस न्याय विभागाचे वरिष्ठ सदस्य आणि दोन्ही देशांतील अन्य मान्यवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी होतील.
सर्वोच्च न्यायालयाची ही नवीन इमारत भारताच्या सहकार्याने उभारण्यात आली. ही इमारत भारतीय सहयोगाने उभारलेला मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस मधील पहिला पायाभूत सुविधा प्रकल्प असेल. 2016 मध्ये मॉरिशसला देण्यात आलेल्या 'विशेष आर्थिक पॅकेज' अंतर्गत भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या पाच पायाभूत सुविधांपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचा हा एक प्रकल्प आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
मॉरिशसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या नवीन इमारतीत 26,000 चौरस मीटर क्षेत्राचा समावेश आहे. ज्यामध्ये 24 कोर्ट रूम आणि अत्याधुनिक उपकरणे तसेच दोन भूमिगत कार पार्किंगचा समावेश आहे. या नवीन पायाभूत सुविधांमध्ये तीन सहाय्यक न्यायालये, चार व्यावसायिक न्यायालये, औपचारिक बाबींसाठी एक न्यायालय आणि कौटुंबिक बाबींसाठी एक न्यायालय देखील असेल.
पोर्ट लुईसमधील एडिथ कॅव्हल स्ट्रीट येथे नवीन सर्वोच्च न्यायालयाच्या बांधकामाचा ठेका भारतीय राष्ट्रीय इमारत बांधकाम महामंडळाला (एनबीसीसी) देण्यात आला आहे. लोकसंख्येच्या गरजा आणि अपेक्षा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी हा प्रकल्प अधिक आधुनिक करण्यात येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर 2019 मध्ये पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी संयुक्तपणे मॉरिशसमधील मेट्रो एक्सप्रेस प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे आणि नवीन ईएनटी हॉस्पिटल प्रकल्पाचे उद्घाटन केले.