लखनौ - पंतप्रधान मोदींनी आज लोकसभा प्रचाराचा नारळ फोडला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथून मोदींना प्रचाराला सुरुवात केली आहे. मेरठमध्ये आज मोदींची जाहीर सभा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींवर काँग्रेसवर हल्लाबोल केला. देशातील १३० कोटी लोकांनी त्यांचे मन बनवले असल्याचे मोदी म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकचे साहस तुमच्या या चौकीदारानेच दाखविले असल्याचेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी यावेळी महायुतीवर टीका केली. महाआघाडीला मोदींनी वारंवार महामिलावट म्हणून संबोधले. महायुतीच्या हातामध्ये देश सुरक्षित नसल्याचेही ते म्हणाले. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात विकास पोहोचलेला आहे, असेही ते म्हणाले. महायुतीतील लोक पाकिस्तानात प्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असेही मोदी म्हणाले. आपल्याला 'सबुत' हवा आहे की 'सपूत' हवा आहे, असा प्रश्नही मोदींनी उपस्थितांना केला.
मी देशासाठी सर्वस्व पणाला लावायला तयार असणारा व्यक्ती आहे. कुठलाच राजकीय किंवा आंतरराष्ट्रीय दबाव मला थांबू शकत नाही. तुम्ही आश्वस्त राहा या चौकीदाराला कोणीचा घाबरवू शकत नाही, असे मोदी म्हणाले. देश सामर्थ्यवान होत असतानाही यांच्या (विरोधक) पोटात दुखत आहे, असेही ते म्हणाले.
आपली वायुसेना लढाऊ विमान मागत होती. जवान बुलेटप्रुफ जॅकेट मागत होते. मात्र, काँग्रेस सरकारने नेहमीच या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोपही मोदींनी केला. काँग्रेसचे सरकार नेहमीच देशाला कमकुवत बनवण्यासाठी प्रयत्न करत राहिले असल्याची टीकाही मोदींनी केली. यांना केवळ परिवाराचा स्वार्थ बघायचा आहे. सबका साथ सबका विकास काँग्रेसला मान्य नाही, असेही मोदी म्हणाले.
ज्या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यासाठी मायावतींनी दोन दशके लावली. आज त्यांच्यासोबत युती केली असल्याची टीका मोदींनी केली. उत्तर प्रदेशला जाती-धर्माच्या नावावर वेगळे करणे शक्य नाही. २०१९ चा निकाल २०१४ पेक्षाही चांगला असेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील यापूर्वीच्या सरकारने राज्यातील तरुणांचे नुकसान केले असल्याचे मोदी म्हणाले.
बुद्धिमान लोकांना थिएटर आणि ए-सॅटमधील फरक कळत नाही -
काही बुद्धिमान लोक असे आहेत की जेव्हा काल मी 'ए-सॅट' विषयी बोलत होतो तेव्हा ते कन्फ्यूज झाले. त्यांना वाटले मी थिएटरमधील सेटविषयी बोलत आहे. आता अशा बुद्धिमान लोकांवर हसावे की रडावे, ज्यांना थिएटर आणि अंतराळातील 'अॅण्टी सॅटेलाईट मिशन' ए-सॅटविषयीमधील फरकही समजत नाही, असे मोदी म्हणाले.
योगीजींच्या काळात उत्तर प्रदेशचा विकास - मोदी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळात उत्तर प्रदेशचा विकास झाला आहे. जेव्हापासून आदित्यनाथ सत्तेवर आले तेव्हापासून येथील बदमाश आणि गुंडांना भीती वाटत आहे, असे मोदी म्हणाले. या काळात उत्तर प्रदेशातील महिला सुरक्षित असल्याचेही ते म्हणाले.