हैदराबाद - 'राम मंदिराचे भूमिपूजन करून पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या शपथेचे उल्लंघन केले, अशी टीका एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. 'भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. आजच्या दिवशी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव झाला असून हिंदुत्त्वाचा विजय झाला आहे', अशा शब्दांत ओवैसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. एखादे मंदिर किंवा मशीद या देशाचे प्रतिक असू शकत नाही. ते एखाद्या विशिष्ट समुदाय किंवा संस्कृतीचे प्रतिक होऊ शकेल मात्र देशाचे नाही, असेही ओवैसी म्हणाले.
'पंतप्रधान मोदी म्हणतात मी भावनिक आहे. मी सुद्धा भावनिक आहे. आदरणीय पंतप्रधानजी, मी भावनिक आहे कारण त्याठिकाणी गेल्या ४५० वर्षांपासून मशीद उभी होती, असेही ओवैसी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून राम मंदिराच्या भूमिपूजनाला उपस्थित राहू नये असे मी एका मुलाखतीत म्हणालो होतो. जर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली तर त्यातून संपूर्ण देशभरात एक संदेश जाईल की, पंतप्रधान मोदी हे एकाच विशिष्ट समुदायाच्या आस्थेला पाठिंबा देतात, असेही ओवैसी म्हणाले.
भारत या देशाला कुठलाही धर्म नाही. नरेंद्र मोदी हे देशातील मुस्लीम, हिंदू, दलित, आदिवासी, शिख, ख्रिश्चन या सर्वधर्मियांचे पंतप्रधान आहेत, असेही ते म्हणाले.