लखनऊ - चीन आणि पाकिस्तानसोबत कधी युद्ध करायचे हे मोदींनी ठरवले असल्याचे वक्तव्य उत्तरप्रदेश भाजप प्रमुख स्वतंत्र देव सिंह यांनी केले आहे. चीनसोबत पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरू असतानाच सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांशी तुलना
अयोध्येतील राम मंदिर आणि अनुच्छेद ३७० वरील निर्णयासारखेच चीन, पाकिस्तानसोबत कधी युद्ध करायचे हे मोदींनी ठरविले असल्याचे ते म्हणाले. भाजप नेते संजय यादव यांच्या घरी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सिंह बोलत होते. सिंह यांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरही पसरली आहे. यावेळी बोलताना त्यांनी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली.
सीमावादावर सरंक्षण मंत्र्यांचे वक्तव्य
चीनसोबतचा सीमावाद संपवायचा असून त्यांना भारताची एक इंचही भूमी न देण्याचा निर्धार आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. ते दोन दिवसीय पश्चिम बंगाल आणि सिक्कीम दौऱ्यावर गेले आहेत. सिक्कीम येथील गंगटोक-नाथुला रोडचे सिंह यांच्याहस्ते उद्घाटन झाले. आर्मी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) या लष्कराच्या संस्थेकडून हा रस्ता बांधण्यात आला आहे. दार्जिलिंगच्या सुकना येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राजनाथ यांनी रस्त्याचे उद्घाटन केले.