बंगळुरू - मागील काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये फोन टॅपिंगचे प्रकरण गाजत आहे. या आधीच्या जेडीएस-काँग्रेसच्या सरकारवर नेत्यांचे फोन टॅप करून हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच याप्ररणाची चौकशी करण्याची मागणी भाजप आणि खुद्द काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. यावर मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.
कर्नाटकमध्ये नवीन सरकार आल्यानंतर फोन टॅपिंगचा मुद्दा गाजत आहे. भाजप नेते एस. प्रकाश यांनी एचडी कुमारस्वामी यांच्या सरकारवर फोन टॅपिंग केल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मागील काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये फोन टॅपिंगचा मुद्दा चर्चेत आहे.
जेडीएसचे माजी नेते एएच विश्वनाथ यांनी देखील जेडीएस-काँग्रेस सकारवर ३०० हून अधिक नेत्यांचे फोन टॅप करून हेरगिरी केल्याचा आरोप केला होता. विश्वनाथ हे स्वत: कुमारस्वामी सरकरामध्ये होते. परंतु बंडखोरी केल्यानंतर त्यांना विधानसभेतून अपात्र घोषित करण्यात आले होते.
दरम्यान, माजी मुंख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचे खंडण केले आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले होते की, "मी आधीही सांगितले होते की मुख्यमंत्री पद हे स्थायी नसून मला सत्तेत राण्यासाठी फोन टॅप करण्याची काहीही गरज नाही. माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत."
20 ऑगस्टला होणार कर्नाटकच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी 20 ऑगस्ट रोजी कर्नाटकच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची माहिती यावेळी दिली.