नवी दिल्ली - देशातील लॉकडाऊन शिथिल होत असताना जूनमध्ये पेट्रोल व डिझेल महागले आहेत. आज पेट्रोलचे दर प्रति लीटर 25 पैशांनी तर डिझेलचे भाव प्रति लीटर 21 पैशांनी वाढले आहेत. तिसऱ्या आठवड्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 9.12 रुपयांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर 11.01 रुपयांनी वाढले आहेत.
दिल्लीमध्ये पेट्रोल 80.38 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 80.40 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर शुक्रवारी पेट्रोलचा दर 80.13 आणि डिझेलचा दर 80.19 रुपये होता. मात्र, दिल्ली राज्याच्या विक्रीकरानुसार दिल्लीतील दर आणि देशातील इतर राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगळे आहेत. मुंबईतील पेट्रोलचा दर 87.14 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 78.71 रुपये प्रति लीटर आहे.
देशात कोरोनामुळे जवळपास अडीचे महिने लॉकडाऊन होता. यामुळे सरकारी तिजोरीवर भार आला आहे. यानंतर सरकारकडे महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल हेच एकमेव चांगले स्रोत आहेत. दिल्लीमध्ये तर, डिझेलचे दर पेट्रोलपेक्षा जास्त आहेत.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर लोकांचे जीवन थोड्याप्रमाणात रुळावर येत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या मागणीत वाढ होत आहे. येत्या काही दिवसांत जनतेला कोरोनासह महागाईचा चटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.