नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झालेली नसतानाही भारतात सलग अकराव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज (बुधवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५५ पैशांची तर डिझेलच्या दरात ६९ पैशांची वाढ करण्यात आली.
मागील ११ दिवसात पेट्रोलच्या दरात ६.२ रुपयाने तर डिझेलच्या दरात ६.४ रुपयांनी वाढ झाली आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ७७.२८ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७५.७९ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. मंगळवारी पेट्रोलच्या दरात ४७ पैसे तर डिझेलच्या दरात ५७ पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा पेट्रोल डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे.
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८४.१५ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७४.३२ रुपये, चेन्नईत पेट्रोलचे दर ८०.८६ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७३.६९ रुपये प्रति लिटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर ७९.०८ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७१.३८ रुपये प्रति लिटर झाले आहेत. बंगळुरूत पेट्रोल ७९.७९ तर डिझेल ७२.०७ रुपये प्रति लिटर झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या बॅरेलचे दर ३५ डॉलरच्या आसपास आहेत. हे दर मागील ११ दिवसात कमी झालेले नाहीत किंवा वाढलेले नाहीत. पण, स्थानिक बाजारपेठेत या बॅरेलचे दर वाढले आहेत. यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान, दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. तसेच सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागूही करण्यात येतात.
हेही वाचा - केंद्र सरकारच्या निविदांमध्ये सहभागी होण्यास चिनी कंपन्यांवर बंदी घाला; स्वदेशी जागरण मंचची मागणी
हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद