नवी दिल्ली - इन्स्टाग्रामवरील 'बॉईस लॉकर रुम' या गृपच्या सदस्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी एसआयटी किंवा सीबीआयकडे द्यावी, अशी मागणीही याचिकेत केली आहे. ही याचिका देवाशीष दुबे यांनी दाखल केली आहे.
दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. महिला आयोगाने इंस्टाग्राम आणि पोलिसांना नोटीस बजावली आहे. या याचिकेत एसआयटी किंवा सीबीआयकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
'बॉईस लॉकर रुम' या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 ई आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 सी, 507, 509 आणि 499 चे उल्लंघन केले आहे. मुलींविषयी या गटाच्या सदस्यांची मानसिकता खूपच वाईट आहे. जर ती रोखली गेली नाही, तर भविष्यात महिलांवरील गुन्हेगारीत वाढ होऊ शकते, असे याचिकेत म्हटले आहे.
काय आहे 'बॉईज लॉकर रुम' प्रकरण?
दिल्लीतील काही शाळकरी मुलांनी एकत्र येऊन सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर 'बॉईज लॉकर रुम' नावाने एक अकाऊंट तयार केले होते. या अकाऊंटच्या ग्रुप चॅटमध्ये आणखीही बरेच लोक अॅड झाले होते, ज्यांमध्ये शाळकरी मुले आणि तरुणांचे प्रमाण जास्त होते. या ग्रुप चॅटमध्ये ही मुले इन्स्टाग्रामवरील इतर मुलींचे फोटो शेअर करत, आणि त्यांच्यावर असभ्य टिप्पणी करत. तसेच कित्येक अल्पवयीन मुलींची छायाचित्रेही या ग्रुपमध्ये शेअर होत, ज्यावर ही मुले चवीने अश्लील टिप्पण्या करत.
कहर म्हणजे, या मुलींवर बलात्कार आणि सामूहिक बलात्कार कसा करता येईल याबाबतही ही मुले चर्चा करत. या चॅटरुममधील संभाषणांचे स्क्रीनशॉट्स लीक झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला, आणि संपूर्ण सोशल मीडिया हादरुन गेला होता. दक्षिण दिल्लीमधील एका तरुणीने या चॅट्सचे स्क्रीनशॉट लीक केले होते. "इन्सटाग्रामवर १७-१८ वर्षाच्या काही मुलांनी 'बॉईज लॉकर रुम' नावाने ग्रुप सुरू केला आहे. यामध्ये ते लहान-मोठ्या मुलींचे एडिट केलेले फोटो शेअर करतात. या ग्रुपमध्ये माझ्या शाळेतील दोन मुलेही आहेत. आता मला आणि माझ्या मैत्रिणींना खूप भीती वाटत आहे. या सर्व प्रकारामुळे आता माझी आई मला इन्स्टाग्राम सोड म्हणत आहे" अशा आशयाच्या कॅप्शनसह तिने हे स्क्रीनशॉट्स शेअर केले होते.