श्रीनगर - सध्या मानवी भागात जंगलातील प्राण्यांचा वावर वाढताना दिसून येत आहे. मागील काही वर्षापासून मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचे वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातून मानवात आणि वन्यजीवात संघर्ष वाढत आहे. असाच काही प्रसंग जम्मू-काश्मीर येथे घडला. मानवी वस्तीत घुसलेल्या अस्वलावर स्थानिकांनी दगडफेक करत त्याला पाण्यात पाडल्याची लज्जास्पद घटना घडली आहे.
सोशल मीडियावर अस्वलावर दगडफेक केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काटेरी तारांच्या कुंपणात अडकलेला अस्वल दिसत आहे. अस्वल यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, यावेळी स्थानिकांनी आरडाओरड करत त्याच्यावर दगडफेक सुरू केली. काही स्थानिकांनी दगडफेक न करण्याची विनंती देखील केली. परंतु, ही विनंती ऐकण्याकडे बहुतेकजणांनी दुर्लक्ष केले.
अस्वल शेवटी पूर्ण ताकतीने काटेरी ताऱ्यांच्या कुंपणातून निघून डोंगरावरती चढतो. यादरम्यान डोंगरावर चढलेल्या अस्वलावर स्थानिकांनी दगडफेक करत त्याला नदीत पाडले. यानंतर स्थानिकांनी जल्लोषदेखील केला. या घटनेमुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आकडेवारीनुसार जंगलातील २५ टक्के वन्यजीव आणि मानवांचा संघर्ष होत आहे.