कोलकाता - स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस रहस्यमयरित्या बेपत्ता झाले असल्याची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत नेताजींसोबत काय झाले होते हे जाणून घेण्याचा अधिकार लोकांना आहे, असे मत व्यक्त केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले आहे की, '1945 मध्ये आजच्याच दिवशी नेताजी तैवानच्या तायहोकू विमानतळावरुन निघाले आणि ते कायमचे गायब झाले. त्यांच्यासोबत नेमके काय झाले होते, हे अद्याप माहीत नाही. देशाच्या सुपुत्राबद्दल जाणून घेण्याचा लोकांना अधिकार आहे'
बोस यांच्या कुटुंबातील काही सदस्य आणि संशोधकांच्या म्हणण्यानुसार नेताजींचा मृत्यू हा विमान अपघातात झाला होता. तर, नेताजींच्या कुटुंबातीलतच इतर सदस्य, त्यांचे चाहते आणि अनेक संशोधक मात्र विमान अपघाताचा सिद्धांत नाकारतात. नेताजींच्या बेपत्ता होण्याचे सत्य जाणून घेण्यासाठी भारत सरकारने तीन चौकशी आयोगांची स्थापना केली होती. यापैकी, मुखर्जी आयोगाने 1999 मध्ये नेताजींच्या बेपत्ता होण्याच्या घटनेची चौकशी केली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम.के. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी तब्बल सहा वर्ष चालली. चौकशीअंती आयेगाने नेताजींच्या हत्येच्या आरोपांपासून बचावासाठी हवाई दुर्घटनेचा सिद्धांत रचला गेल्याचा निष्कर्ष काढला. मात्र, 2006 मध्ये कॉंग्रेस सरकारने मुखर्जी आयोगाचा अहवाल नाकारला होता.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगाल सरकारने 2015 मध्ये नेताजींवर आधारित 64 फाईल्सवरील बंदी उठवली होती. मोदी सरकारच्या काळातही नेताजींशी संबंधित अनेक फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या आहेत.