श्रीनगर - जम्मू-काश्मीर पोलिसांनी आज पीडीपीचे कार्यालय सील केले आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी टि्वट करून यासंदर्भात माहिती दिली. जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या भूमी कायद्यविरोधात काश्मीरमध्ये पीडीपीद्वारे आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांनी पीडीपी नेते खुर्शीद आलम यांच्यासह पीडीपीच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
मेहबूबा मुफ्ती यांनी टि्वट करत केंद्र सरकावर टीका केली आहे. श्रीनगरमधील पीडीपी कार्यालय सील करण्यात आले आहे. तर शांततेत आंदोलन करणाऱ्या पीडीपीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. अशाच एका आंदोलनाला जम्मूमध्ये परवानगी देण्यात आली. मात्र, श्रीनगरमध्ये आंदोलन रोखण्यात आले. ही तुमची सामान्य परिस्थितीची परिभाषा आहे का, असा सवाल त्यांनी टि्वटमधून केला.
पीडीपी कार्यालयावर फडकवला होता तिरंगा -
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी कार्यालयावर देखील तिरंगा ध्वज फडकवला होता. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची जवळपास 8 महिन्यांनंतर नजरकैदैतून सुटका करण्यात आली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत, जोपर्यंत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त होत नाही. तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही, असे म्हटलं होते. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
पीपल्स फॉर गुपकर डिक्लेरेशन -
मेहबुबा मुफ्ती यांनी 15 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी असलेल्या सर्वपक्षीय बैठकीत भाग घेतला होता. काश्मीरला पुन्हा कलम 370चा दर्जा परत मिळावा, यासाठी राज्यातील सर्व पक्षांनी मिळून 'पीपल्स फॉर गुपकर डिक्लेरेशन' या पक्षांची स्थापन केली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अनुच्छेद 370 रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर आणि लोकशाही विरोधी होता. हा निर्णय मागे घेण्यासाठी काश्मिरी जनता मिळून लढा देईल. हे काम सोपं असणार नाही. मात्र, निर्धाराने आम्ही प्रयत्न करू, असे मुफ्ती एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाल्या होत्या.