नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर लाखो लोकांना गरिबी रेषेच्याही खाली ढकलण्यात आले. काँग्रेसकडे याचा तोडगा होता, पण कुणी ऐकलेच नाही. असे म्हणून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भाजप सरकारवर शरसंधान साधले. आयएनएक्स मीडिया प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर बुधवारी ते जामिनावर बाहेर आले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना चिदंबरम यांनी अनेक विषयांवर मते मांडली.
त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढायला हवे
चिदंबरम म्हणाले, की मी कारागृहाच्या बाहेर आल्या-आल्या माझ्या मनात काश्मिरींबद्दल विचार आला. ७५ लाख लोकांना आपण स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क नाकारला आहे. ऑगस्टपासून ते कारागृहातल्या सारखे जीवन जगत आहेत. त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपण लढा द्यायला हवा. अनेक नेत्यांना कोणत्याही ठोस आरोपाशिवाय अटक केली जात असल्याचेही चिदंबरम म्हणाले.
माझा कारभार त्यांना माहिती आहे
कारागृहातून बाहेर आल्यानंतर चिदंबरम यांनी स्वतःविषयी सफाई दिली. ते म्हणाले, की ज्या अधिकाऱ्यांनी माझ्यासोबत काम केले आहे, ज्या उद्योगपती आणि पत्रकारांचा माझ्याशी संबंध आला आहे. त्यांना माझ्या कारभाराविषयी माहिती आहे. असे म्हणून चिदंबरम यांनी स्वतः निर्दोष असल्याचे सुचवले.
सर्वत्र भीतीचे वातावरण
यावेळी चिदंबरम यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर कठोर शब्दात टीका केली. नोटाबंदीनंतर लाखो लोक गरिबी रेषेच्या खाली ढकलले गेले. लोकांजवळ पैसा नाही, त्यामुळे मागणी कमी झाली. पण, याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही. राहुल बजाज हे प्रतिष्ठीत उद्योगपती आहेत, त्यामुळे ते बोलु तरी शकले. पण, उद्योग जगतात भीती आहे. पत्रकारांमध्ये भीती आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण असल्याची चिंता चिदंबरम यांनी व्यक्त केली.
मागितला तर आम्ही सल्ला देऊ
भाजप सरकारची आर्थिक धोरणे लक्षात आल्यानंतर त्यांना आरबीआयच्या गव्हर्नरनी विरोध केला. त्यामुळे रघुराम राजनपासून उर्जित पटेलांपर्यंत सगळ्यांना पद सोडावे लागले, असे चिदंबरम म्हणाले. ही मंदी मानवनिर्मीत आहे. काँग्रेसकडे यावर उपाय आहे. आम्हाला सरकारने बोलावले तर आम्ही सल्ला नक्कीच देऊ असे चिदंबरम यांनी सांगितले.