बोकारो - लग्नगाठ ही सात जन्मासाठी बांधली जाते. मात्र, बिहारमधील पकडुआ या लग्नाच्या कुप्रथेने अनेक तरूण-तरूणींची आयुष्य उध्वस्त करून टाकले आहे. बिहारमधील बोकारो येथील बीएसएल मध्ये सहाय्यक व्यवस्थापक असणारे विनोद कुमार हे सुद्धा या कुप्रथेचे बळी ठरले आहेत. मात्र, त्यांनी २ वर्षे लढलेल्या न्यायालयीन लढाईमुळे पटना कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा विवाह रद्द करत त्यांना न्याय दिला आहे.
३ डिसेंबर रोजी घडली घटना -
३ डिसेंबर रोजी विनोदला त्यांच्या एका कौटंबिक मित्राने भेटण्यासाठी मोकामा जवळील पंडारक ठाण्याच्या गोप कित्ता या गावी बोलावले. त्यानंतर त्या मित्राने विनोद यांना बंदूकीचा धाक दाखवत त्याच्या बहिणीसोबत लग्न करवून घेतले. विनोदने यासाठी विरोध केल्यावर सुरेंद्र यादव आणि त्याच्या परिवाराने त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्याने दबावात येऊन हे लग्न केले. मात्र, लग्नानंतरही विनोद यांनी याचा विरोध केल्यावर पुन्हा त्यांना मारहाण करण्यात आली. व एका रूममध्ये बंद करून दिले गेले.
पोलिसांनी दिला नकार -
अथक प्रयत्नांनंतर विनोद यांना आपल्या परिवारासोबत संपर्क करून बोलावले. त्यानंतर पंडारक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना मदतीसाठी नकार दिला. तसेच त्यांच्यावर मुलीला सोबत ठेवण्यासाठी दबाव टाकला. त्यांच्या नातेवाईकांनी वरिष्ठ अधिकाऱयांना भेटून सर्व हकीकत सांगितल्यावर त्याला सोडण्यात आले.
यानंतर विनोदसोबत त्या मुलीला घरी पाठवण्यासाठी पोलीस आणि मुलीच्या घरच्या लोकांनी शक्य ते सर्व प्रयत्न् केले. मात्र, त्यांनी या मुलीचा स्वीकार करायला स्पष्ट नकार दिला. आणि पटना येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये खटला दाखल केला. त्यासोबतच त्यांना मिळालेल्या जीवे मारण्याची धमकी, आणि पोलिसांनी त्याला दिलेली वागणूकीच्या विरोधात त्यांनी फौजदारी न्यायालयामध्येही खटला दाखल केला.
यानतंर २ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर पटना येथील कौटुंबिक न्यायालयाने या लग्न रद्द केले. पोलिसांनी या प्रकरणामध्ये त्यांच्यासोबत गैरवर्तन केले व कोणत्याच प्रकारची मदत केली नाही. मात्र, तरीही सत्याचा विजय झाला, असे न्यायालयाच्या निर्णयानंतर विनोद यांनी म्हटले आहे.