नवी दिल्ली - देशभरात मे महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. त्यानंतर टाळेबंदी लागू करण्यात आली. आता अनलॉक ५ अंतर्गत अर्थव्यवस्था रुळावर येत असली तरी नागरिकांची खरेदी क्षमता कमी झाल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम राजधानी दिल्लीतील बाजारात दिसून येत आहे. सणासुदीचे दिवस असतानाही शहरातील कॅनॉट पॅलेस येथील बाजारात शुकशुकाट आहे. दरवर्षी येथे या काळात मोठी गर्दी असते. मात्र, कोरोनाचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे.
ब्रँडेड वस्तूंची मागणी रोडावली -
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे मध्य दिल्लीतील ४० टक्के व्यवसायावर परिणाम झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याकाळात दरवर्षी दिल्लीतील बाजार परदेशी नागरिकांसह गजबजलेले असतात. ब्रँडेड कपडे, बूट, बॅग्ज यांच्यासह इतर वस्तूंना मोठी मागणी असते. मात्र, यावर्षी ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
५० टक्केच ग्राहक बाजारात -
दिवाळी अवघ्या पंधरा दिवसांवर आली असताना बाजार थंड पडले आहेत. सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवार, रविवारी थोडी गर्दी पाहायला मिळते. मात्र, आठवड्यातील इतर दिवशी बाजार सुन्न पडलेले असतात. कोरोना काळात फक्त ५० टक्के ग्राहकच दुकानात येत आहेत. त्यातील फक्त ८० टक्केच खरेदी करतात, असे मध्य दिल्लीतील एका दुकानदाराने सांगितले.
कोरोनाची भीती अजूनही -
नागरिक घराबाहेर पडत नाहीत. फक्त ५० टक्के गर्दी बाजारात पाहायला मिळतेय. फक्त सुट्टीच्या दिवशी गर्दी होते. नागरिक कोरोला अजूनही घाबरत असून त्यामुळे घराबाहेर पडत नाहीत, असे सचिन कुमार या दुकानदाराने सांगितले. काही ग्राहक बाजारात फक्त फेरफटका मारण्यास येत असून खरेदी करण्यासाठी नाही, असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या एका दुकानदाराने म्हटले, कोरोनामुळे अनेकांचे नोकऱ्या जात आहेत. आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे कपडे आणि बुटांच्या मागणी कमी झाली आहे. त्याचा बाजारावर परिणाम झाला आहे.