श्रीनगर - भारतीय लष्कराच्या वतीने लेफ्टनंट जनरल के. जेएस. धिल्लाँ जम्मू-काश्मीरमध्ये पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तान काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, २ पाकिस्तानी नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे दोघेही लश्कर-ए-तैयबाशी संलग्न असल्याची माहिती मिळाली होती.
'पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवला आहे. याचे अनेक पुरावे आमच्याजवळ आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तान अनेक कारवाया करत आहे. ५ ऑगस्टनंतर याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, पाकिस्तान आणि त्यांचे लष्कर यांनी काहीही केले तरी त्यांच्या सर्व चाली आम्ही हाणून पाडू. पाकिस्तानला 1971 पेक्षाही अधिक जबरदस्त धडा शिकवू,' असे लेफ्टनंट जनरल धिल्लाँ म्हणाले.
आर्टिकल ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यास आले आहे. काश्मीरमध्ये विध्वंस घडवून आणण्यासाठी पाकिस्तानच्या कारवाया सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.