इस्लामाबाद - पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने केलेल्या हवाई हल्ल्याने पाकिस्तानमध्ये संतापाचे वातावरण आहे. भारताने आमच्यावर केलेला हा गंभीर हल्ला आहे. स्वरक्षणासाठी आम्हीही भारताला प्रत्युत्तर देऊ, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.
हे नियंत्रण रेषेचे (एलओसी) उल्लंघन आहे. यावर आम्ही कडक पाऊल उचलू आणि स्वरक्षणासाठी प्रत्युत्तर देऊ, असे कुरेशी यांनी म्हटले आहे. पाक परराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे या हल्ल्यानंतर आणखीन काही घडामोडी घडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यानंतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी बैठक बोलावली असल्याचे कुरेशी म्हणाले. भारताचा हा गंभीर हल्ला आहे, याबद्दल आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार करणार आहोत. पाकिस्तानही भारताला 'योग्य' प्रतिक्रिया देईल, असे ते म्हणाले.