नवी दिल्ली - भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव तथाकथित हेरगिरीच्या आरोपाखाली 2016पासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. जाधव यांना तिसऱ्यांदा कौन्सिलर सहाय्य (राजनैतिक सहाय्य) उपलब्ध करून दिल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी आज (शुक्रवार) दिले आहे. जाधव यांच्याशी चर्चा करताना कोणताही पाकिस्तानी अधिकारी किंवा सुरक्षारक्षक जवळ उपस्थित राहू नये, अशी मागणी भारताने केली आहे.
काल (गुरुवार) भारतीय उच्चायुक्तालयातील दोन अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यास गेले होते. मात्र, जास्त चर्चा न करताच माघारी आले. पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना जाधव यांच्याशी मुक्तपणे संवाद साधू दिला नाही. त्यामुळे जाधव तणावाखाली होते. पाकिस्तानने कोणत्याही अटीशिवाय खुलेपणाने संवाद करू द्यावा, अशी मागणी भारताने केली आहे.
भारतीय अधिकारी आणि जाधव यांच्यातील संभाषण रेकॉर्ड करण्यात येत होते. त्यामुळे राजनैतिक सहाय्य देण्यास काहीच अर्थ राहात नाही. संभाषण सुरू असताना पाकिस्तानी अधिकारी एकदम जवळ उभे होते. उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी विरोध केला असतानाही अधिकारी तेथेच होते, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कोणत्याही अटीविना राजनैतिक अधिकाऱ्याचे सहाय्य कुलभूषण जाधव यांना मिळावे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे 12 वेळा केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या नियमांचे पालन करण्याबाबतचा अध्यादेश पाकिस्तानने मेमध्ये पास केला आहे. मात्र, तरीही त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नाही.
कुलभूषण जाधव यांना 2016 साली बलुचिस्तान येथून पाकिस्तानने तथाकथित हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. देशात दहशतवाद पसरविणे आणि देशविरोधी कारवाया करणे असे खोटे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. जाधव यांना राजनैतिक सहाय्य मिळावे, ही मागणी न्यायालयाने मान्य करत फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.