नवी दिल्ली - इंग्रजांच्या १५० वर्षांच्या गुलामीनंतर भारत आणि पाकिस्तान १५ ऑगस्टला स्वतंत्र झाले. भारतात दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. मात्र, पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. त्यामागे अनेक कारणं सांगितली जातात...
स्वातंत्र्य विधेयक ब्रिटिश संसदेने 18 जुलै रोजी मंजूर केले होते. या विधेयकानुसार 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री भारताचे विभाजन होईल. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन नवीन देश अस्तित्त्वात येतील, असे ठरले होते.
15 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली आणि कराची या दोन्ही ठिकाणी लॉर्ड माऊंटबॅटन एकाच वेळी उपस्थित राहू शकत नव्हते. अशा परिस्थितीत लॉर्ड माउंटबॅटन यांनी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानकडे सत्ता हस्तांतरित केली. त्यानंतर लगेचच कराची येथे पाकिस्तानी ध्वज फडकविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची तारीख नंतर 14 ऑगस्ट करण्यात आल्याचं म्हटले जाते.
याचबरोबर 14 ऑगस्ट रोजी रमजानचा २७ वा शब-ए-कद्र हा दिवस होता. हा दिवस इस्लामीक कॅलेंडरनुसार पवित्र मानला जातो. त्यामुळे पाकिस्ताने 14 ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य दिवस करण्याचे ठरवले असेही म्हटले जाते.