श्रीनगर- काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. राजोरी जिल्ह्याच्या सुंदरबनी भागात रविवारी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्कर या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे.
नौशेरा सेक्टरच्या कलाल भागात सीमेवरुन तोफखाना आणि लहान शस्त्रांनी रविवारी संध्याकाळी गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्याने याला जोरदार आणि परिणामकारक उत्तर दिले. यावेळी कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पाकिस्तानने शनिवारी केलेल्या गोळीबारात भारताचे लान्स नाईक संदीप थापा शहीद झाले होते. राजोरी भागात झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भारतीय लष्कर सतर्क असून पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास भारतीय जवान तयार आहेत.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला घडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावेळी प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानी सैन्याच्या 3 जवानांचा खात्मा केला होता. काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. सीमेवर मोठा गोळीबार होत असून याचा फायदा घेत पाकिस्तान काही दहशतवादी भारतीय हद्दीत घुसवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे.