श्रीनगर - पाकिस्तानने पाच महिन्यांपूर्वी नियंत्रण रेषा ओलांडलेल्या एका 33 वर्षीय भारतीय नागरिकाची मुक्तता केली आहे. या नागरिकाची पुंच्छमधून सुटका करण्यात आली आहे.
मोहम्मद इलियास, असे या व्यक्तीचे नाव असून 17 मे रोजी त्याला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताच्या ताब्यात दिले. यानंतर तो घरी परतला.
इलियास हा मानसिक दृष्ट्या आजाराने त्रस्त आहे. तो जवळच्या ठिकाणी नियमित भटकत असायचा. अशावेळी पोलीस किंवा सैनिक त्याला घरी परत आणत असत. एक दिवस तो घरातून बाहेर पडला ते घरी परतलाच नाही. त्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हा तो आम्हाला पाकिस्तानमध्ये असल्याचे समजले, असे इलियासच्या वडिलांनी सांगितले.
माझा मुलगा सुरक्षितपणे घरी परतला आहे, त्यामुळे मी भारतीय सेना, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचे आभार मानतो. असेही इलियासचे वडिल म्हणाले.