नवी दिल्ली - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी पुलवामा हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्यानंतर प्रत्येक जण पाकिस्तानला दोष देत आहे. मात्र, याबाबतचा अजून पुरावा नाही, असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. मोदींच्या मनात कुठलीही आग नाही. त्यापेक्षा जास्त आग माझ्या मनात लागते जेव्हा हजारो काश्मिरींना मारले जाते, असेही मुशर्रफ म्हणाले.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तान सरकार सहभागी आहे, असे म्हणता येणार नाही. ही घटना खूप भीषण आणि दु:खद आहे, असे मुशर्रफ म्हणाले.पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यावर धडकवली. या घटनेत भारताचे ४५ जवान शहीद झाले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने हल्ला केल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ असे म्हटले आहे.