नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी दिल्ली न्यायालयाने 3 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी यावेळी चिदंबरम यांच्या वैद्यकीय तपासणीला परवानगीदेखील दिली आहे. सॉलिटर जनरल तुषार मेहता यांनी सीबीआयतर्फे मागणी केल्यानंतर ही मुदतवाढ देण्यात आली.
चिदंबरम यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याच्या मागणीला विरोध दर्शविला होता. यासंबंधीचे लेखी निवेदनही त्यांनी न्यायालयाला दिले होते. चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडीदरम्यान तिहार कारागृहात नियमित वैद्यकीय तपासणी आणि पूरक आहार पुरवण्याची मागणीही सिब्बल यांनी केली आहे. ते म्हणाले की, "73 वर्षीय चिदंबरम उच्च रक्तदाब, अशक्तपणा, दृष्टीदोषासारख्या आजारांनी ग्रस्त आहेत. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचे वजन कमी झाले आहे" चिदंबरम यांचीच बाजू मांडणारे वरिष्ठ वकील अभिषेक सिंघवी हे देखील सुनावणीवेळी हजर होते. ते म्हणाले "चिदंबरम यांच्या कक्षात बाहेरील सभागृहात एक खुर्ची होती. ती काढून घेण्यात आली आहे. चिदंबरम फक्त पलंगावरच बसू शकतात. त्यांना उशीदेखील देण्यात आलेली नाही. एम्समध्ये त्यांची तपासणी करण्याची परवानगी न्यायालयाने द्यावी"
हेही वाचा - संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची 'तेजस'मधून भरारी
यावर, कोणत्याही कैद्याचे आरोग्य ही चिंताजनक बाब असते. कायद्यात परवानगी असेल अशा सर्व सोयी चिदंबरम यांना दिल्या जातील, असे जेल अधिकारी मेहता यांनी स्पष्ट केले आहे. अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते चिदंबरम यांना सीबीआयने २१ ऑगस्टला त्यांच्या जोरबाग येथील निवासस्थानावरून अटक केली होती.