नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले असून भारतामध्ये कोरोना विषाणूची संख्या 151 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणूपासून जर बचाव करायचा असेल, तर सर्व शहरे बंद करायला हवीत, असे टि्वट माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केले आहे.
'कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी देशातील शहरे बंद करण्याची हीच वेळ आहे. त्रासदायक असलेले मात्र, सुरक्षा प्रदान करणारे निर्णय घेण्याची सध्या गरज आहे. तसेच कोरोनामुळे सर्वांत जास्त प्रभाव पडणाऱ्या गरीब लोकांसाठी सरकारने मदतीची घोषणा करावी', असेही पी. चिदंबरम यांनी टि्वट करून म्हटले आहे.
दरम्यान सरकारने कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केले आहे. सरकारकडून नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असलेला हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.