हैदाराबाद - कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूच्या विळख्यातून कुणीही सुटलेलं नाही. मात्र, 17 दिवस कोरोनाबाधित आईजवळ राहूनही दीड वर्षांच्या बाळाला कोरोनची लागण झाली नसल्याची घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. कोरोना प्रभावित आईबरोबर राहिल्यानंतरही कोरोनाचा मुलावर परिणाम न झाल्याने तो सुखरूप आहे.
चित्तूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यामुळे व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि कुटुंबातील स्त्रियांही त्यापासून प्रभावित झाल्या. त्यानंतर सर्वांना चित्तूर सरकारी रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये निरक्षणाखाली ठेवण्यात आले.
दरम्यान दीड वर्षांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी कुणी नसल्याने बाळ कोरोनाबाधित आईजवळ थांबले. त्यांची दोन वेळा कोरोना चाचणी घेण्यात आली. अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून दीड वर्षाच्या मुलामधील रोग प्रतिकारक शक्तीपाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले आहे.