भुवनेश्वर : ओडिशातील मलकानगिरीच्या जिल्हाधिकाऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी असलेल्या या अधिकाऱ्यासह त्याच्या कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिकाऱ्याच्या माजी पीएचा गेल्यावर्षी संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी उपविभागीय न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशावरुन हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनीष अगरवाल असे या जिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. आपल्या पीएची हत्या करुन, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यासाठी अगरवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
हे आहे प्रकरण..
गेल्यावर्षी २८ डिसेंबरच्या रात्री जिल्हाधिकाऱ्यांचे खासगी सहाय्यक देब नारायण पांडा यांचा मृतदेह मलकानगिरीजवळील एका जलाशयात आढळला होता. २७ तारखेपासून ते बेपत्ता होते. पांडा यांनी आत्महत्या केल्याचा संशय प्राथमिक अहवालात मांडण्यात आला होता. मात्र, या घटनेच्या सहा महिन्यांनंतर पांडा यांच्या पत्नीने जिल्हाधिकारी आणि कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांवर देब यांची हत्या केल्याचा आरोप केला.
याप्रकरणी पांडा यांच्या कुटुंबीयांनी लेखी तक्रार देऊनही पोलिसांनी त्याची नोंद केली नव्हती. त्यानंतर पांडा यांच्या कुटुंबीयांनी ओडिशा मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने राज्य पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पांडा कुटुंबीयांनी उपविभागीय न्यायदंडाधिकारी न्यायालयातही तक्रार दाखल केली, ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा : राजस्थान : बलात्कार पीडिता आणि तिच्या मुलीला आरोपीने जिवंत जाळले; दोघी गंभीर