नवी दिल्ली - देशभरामधून आज जनता कर्फ्यूला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. देशवासियांनी टाळ्या-थाळ्या अन् घंटेचा नाद करत कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्या लोकांचा सन्मान केला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांनी दिलेल्या समर्थनाबाबत आभार व्यक्त केले आहेत. 'हा धन्यवादाचा नाद आहे आणि एका मोठ्या लढाईच्या विजयाची सुरुवात. आज एक संकल्प करत आपण एका दीर्घ लढाईसाठी स्वत:ला बंधनात बाधून घेऊ या', असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
'आज जनता कर्फ्यू रात्री 9 वाजता संपेल. मात्र, याचा अर्थ हा नाही की, तुम्ही 9 नंतर घराबाहेर पडून सेलिब्रेशन करावे. हे आपलं यश आहे, असे समजू नका. ही फक्त एका मोठ्या लढाईची सुरुवात आहे. आज देशवासियांनी दाखवून दिलयं की, आपण ठरवलं तर मोठ्यातल्या मोठ्या आव्हानाला एकत्र सामोरं जाऊ शकतो', असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना केंद्र सरकार आणि राज्य प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. ज्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. तेथील लोकांनी घराबाहेर पडू नये. जर अत्यावश्यक काम असेल, तरच घराबाहेर पडावे, असे मोदींनी म्हटले आहे.
दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाशी लढणाऱ्यांना टाळ्या वाजवून सलामी दिली.