नवी दिल्ली - काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्यात लष्करातील कर्नल, मेजरसह तीन जवान शहीद झाले. याबरोबरच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघनही वाढले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लष्करी आणि गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांबरोबर काल(शनिवार) महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे अजित डोवाल यांनी सांगितले. या बैठकीनंतर डोवाल यांनी गृहमंत्री यांना काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिली. लष्कर आणि निमलष्करी दलाला सीमाभागात गस्त वाढविण्याचे सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.