नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना नोटीस बजावली आहे. साध्वींनी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यासंदर्भात त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी आयोगाने त्यांच्याकडून २४ तासात उत्तर मागितले आहे.
माझ्या वक्तव्यामुळे शत्रूंना फायदा होईल त्यामुळे माझे वक्तव्य मागे घेते. मी यासाठी माफी मागते. माझ्या शब्दांमुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते, असे साध्वींनी स्पष्टिकरणात म्हटले होते.
काय म्हणाल्या होत्या साध्वी?
दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारून माझे सूतक संपवले, असे वादग्रस्त वक्तव्य साध्वींनी केले होते. यानंतर साध्वींवर सर्वस्तरातून टीका झाली होती. 'मैने कहा था तेरा सर्वनाश होगा' असेही साध्वी म्हणाल्या. हेमंत करकरे यांनी माझ्यावर केलेली कारवाई ही देशद्रोही आणि धर्मविरोधी होती. तसेच त्यांनी माझ्यासोबत चुकीचा व्यवहार केला असल्याचेही साध्वी म्हणाल्या होत्या.
मालेगाव स्फोट प्रकरण -
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 च्या रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी अंजुमन चौक आणि भीकू चौक यांच्यामधील शकील गुड्स ट्रान्सपोर्टसमोर एक स्फोट झाला होता. यात 7 जणांचा मृत्यू झाला होता तर, 101 जण जखमी झाले होते. या स्फोटासाठी एका दुचाकीचा वापर करण्यात आला होता. NIA च्या अहवालानुसार, या दुचाकीची नोंद प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाची चौकशी केली आणि या दुचाकीचे संबंध सुरत आणि प्रज्ञा ठाकूर यांच्याशी असल्याचे लक्षात आले होते.
दुचाकी आणि प्रज्ञा यांचे कनेक्शन -
ATS चार्जशीटनुसार, प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात सर्वांत मोठा पुरावा दुचाकी त्यांच्या नावावर असणे हा होता. यानंतर प्रज्ञा यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोकोका किंवा MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली. चार्जशीटनुसार, चौकशी अधिकाऱ्यांना मेजर रमेश उपाध्याय आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यातील एक संभाषण मिळाले, ज्यामध्ये मालेगाव स्फोटातील प्रज्ञा यांच्या भूमिकेविषयी उल्लेख होता.