नवी दिल्ली- रविवारी 1500 पीपीई किटचे उत्पादन करत उत्तर रेल्वेच्या वर्कशॉप्सने 10 हजार पीपीई किट बनवण्याचा टप्पा पूर्ण केला. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आम्ही वैद्यकीय मानकानुसार उत्तम दर्जाच्या पीपीई किटचे उत्पादन करत आहोत,असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशभरातील पीपीई किटची मागणी पाहता डीआरडीओ या संस्थेने उत्तर रेल्वे विभागाला पीपीई किट तयार करण्याची परवानगी दिली होती. जे रुग्णालयीन कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येतात त्यांच्यासाठी पीपीई किट आवश्यक आहे.
जगधरी रेल्वे वर्कशॉपने डीआरडीओने पीपीई किट निर्मिती करण्यासाठी डीआरडीओतर्फे घेण्यात आलेल्या चाचणीत यश मिळवले होते. त्यांनंतर त्यांनी कालका वर्कशॉपच्या सहकार्याने 6472 पीपीई कीट रविवारपर्यंत बनवले आहेत.
उत्तर रेल्वे विभागाने 10 हजार पीपीई किट बनवण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. उत्तर रेल्वे विभाग आणि इतर रेल्वे विभागांनी मिळून लॉकडाऊन कालावधीमध्ये 20 हजार पीपीई किट बनवले आहेत. मे महिन्याच्या शेवटपर्यंत 1 लाख 30 हजार पीपीई किट तयार करण्याचा भारतीय रेल्वेचा मानस आहे.
उत्तर रेल्वे विभागाने 5917 लिटर सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. 46373 मास्क तयार केले असून 540 रेल्वे कोचचे विलगीकरण कक्षात रुपांतर केले आहे. यावरुन भारतीय रेल्वे कोरोना विरुद्धच्या लढाईत ताकदीने उतरल्याचे दिसते.