नवी दिल्ली - अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते आणि भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळवल्याबद्दल मोदींनी त्यांचे कौतुक केले. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक झाली.
लोकांच्या सबलीकरणाासाठी अभिजीत बॅनर्जी जे काम करत आहेत, त्याबद्दल त्यांचे लक्ष्य स्पष्ट आहे. त्यांच्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे. असे म्हणत मोदींनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आल्याचे ट्विट मोदींनी केले आहे.
मूळ भारतीय वंशाचे असलेले अभिजित बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल मिळाला आहे. हा नोबेल त्यांना पत्नी इस्थर डफ्लो आणि अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांच्यासमवेत संयुक्तपणे मिळाला आहे. बॅनर्जी हे अमेरिकेमधील एमआयटीच्या फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत.
अभिजित बॅनर्जी यांचा मुंबईमध्ये १९६१ मध्ये जन्म झाला. त्यांना 'जागतिक गरिबी दूर हटविण्यासाठी प्रयोगात्मक दृष्टीकोन' या विषयावर अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे. ५८ वर्षीय बॅनर्जी यांनी हॉवर्ड विद्यापीठातून १९८८ मध्ये पीएच. डी. मिळविली आहे. कोलकाता विद्यापीठात तसेच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधून त्यांनी शिक्षण घेतले आहे.