गया - बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळीस आता राजकीय रंग चढू लागला आहे. येथील महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगला परवानगी नाकराल्याने त्यांची आज होणारी प्रचार सभा स्थगित करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने पंतप्रधान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टरला हरिदास सेमिनरीमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे तेजस्वी यादव यांना आपला कार्यक्रम रद्द करावा लागला. ते काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या प्रचारसभेस संबोधन करणार होते.
तांत्रिक अडचणीमुळे नाकारली परवानगी- जिल्हाधिकारी
गयाचे जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांच्या म्हणण्यानुसार हरिदास सेमिनरी येथून मोदी यांच्या नियोजित प्रचारसभेचे स्थळ असलेले गांधी मैदान अर्ध्या किमी पेक्षाही कमी अंतरावर आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांची सभा पूर्व नियोजित आहे. या अशा तांत्रिक बाबी लक्षात घेता तेजस्वी यादव यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यास परवानगी नाकरण्यात आली आहे. तेजस्वी यांना हवे असल्यास ते विमानतळावर हेलिकॉप्टर उतरवून सभास्थळी उपस्थिती लावू शकतात. त्या ठिकाणी त्यांना हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी देण्यात येत आहे.
आज सकाळी ९ वाजता होती सभा-
तेजस्वी यादव यांची सभा शुक्रवारी सकाळी 9 वाजता टाऊन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे उपमहापौर अखौरी ओंकारनाथ उर्फ मोहन श्रीवास्तव यांच्या प्रचारासभेला संबोधित करणार होते. मात्र, तो कार्यक्रम अखेर रद्द झाला.
पंतप्रधान मोदींची सभा त्याच परिसरात-
महाराष्ट्रात ज्या प्रमाणे भाजप नेत्यांची फौज उतरली होती. त्याच प्रमाणे बिहार निवडणुकीसाठीही भाजपचे दिग्गज नेते प्रचाराच्या रणांगणामध्ये दिसून येत आहेत. खुद्द पंतप्रधान मोदीही आज गयामध्ये प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. मोदी यांची ही सभा देखील आजच होणार आहे. गया येथील गांधी मैदानावर त्यांची सभा होणार आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी ते सभेला संबोधित करतील. खरेतर पंतप्रधान मोदी सकाळी 9 वाजताच एयरपोर्टवर दाखल होणार आहेत. तेथून ते सासाराम ला जाणार आहेत. त्यानंतर भागलपूर मध्ये ते बिहार निवडणुकीतील त्यांच्या पहिल्या सभेला संबोधित करणार आहेत.
भागलपूरच्या सभेला संबोधित केल्यानंतर ते परत गया एयरपोर्ट येतील आणि दिल्लीला रवाना होतील. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांच्या हेलिकॉप्टर लॅडिंगला परवानगी नाकारण्यात आली आहे.