नवी दिल्ली - देशभरात लागू असलेली संचारबंदी 14 एप्रिलला संपत आहे. त्यानंतर रेल्वे सेवा सुरुळीत होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, यासंबंधी अंतिम निर्णय झाला नसून येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचे, रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
21 दिवसांची संचारबंदी संपल्यानंतर रेल्वेचे विभागीय कार्यालये प्रवासी गाड्या सुरू करण्याची तयारी करत असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, असा कोणताही निर्णय झाला नसून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे, रेल्वे विभागाने जाहीर केले.
सुवा सुरळीत करण्याआधी प्रत्येक गाडीसाठी रेल्वे बोर्डाकडून मंजूर घ्यावी लागेल. तसेच टप्याटप्याने रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे नियोजन देण्याची गरज असल्याचे, रेल्वे विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यामध्ये हा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
परंतु, कोरोनासंबधी स्थापन केलेल्या मंत्रीगटाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत होणार आहे. रेल्वेची सर्व 17 विभाग सेवा सुरळीत करण्यासाठी तयारी करत असून गाड्यांचा आढावा घेत आहेत. रेल्वे प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना राबवणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. 15 एप्रिलपासून नव्याने सेवा सुरू करण्यात येईल, अशी नवी नोटीस देण्याची गरज नाही, कारण 14 एप्रिलपर्यंतच तिकिट रद्द करण्यात आले आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले.