नवी दिल्ली - लडाखमध्ये चीनी सैन्यांची काही वाहने घुसल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, तो व्हिडिओ फेक असल्याचे सरकारने म्हटलं आहे. एक जून व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, असे प्रशासनाने म्हटलं आहे.
पूर्व लडाखमधील न्योमा भागातील चांगथांगमधील हा व्हिडिओ असून तो 5 मिनिटे 26 सेंकदाचा आहे. या व्हिडिओमध्ये वाहने दिसत आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे. काही चीनी गाड्या लडाखमध्ये आल्या होत्या. यावेळी त्या भागात गुरे राखण्यासाठी गेलेल्या लोकांशी चीनी लोकांनी हुज्जत घातली. या भागामध्ये आपली गुरे चरण्यासाठी आणू नका असे त्यांचे म्हणणे होते, असे लडाखच्या न्योमा मतदारसंघातील नगरसेवक इश्ये स्पालझंग यांनी सांगितले. मात्र, चीनी सैन्य भारतीय सीमेत घुसल्याचे वृत्त प्रशासनाने फेटाळले आहे.
चीनचा सामना करण्यास लष्कर सज्ज -
गेल्या जून महिन्यापासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. चीनने पूर्व लडाखमधील भारत चीन सीमेवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सीमेवर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर एकमेकांसमोर ठाकले आहे. भारताने चिनी अतिक्रमण रोखण्यासाठी सीमेवर शस्त्रसामुग्री जमा केली आहे. चीनचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असून सीमेवर T-90, T-72 रणगाडे तैनात केले आहेत. भारताने मागील काही दिवसांत मोक्याच्या ठिकाणांवर ताबा मिळवल्याने चीनच्या हालचालींवर दुरून लक्ष ठेवता येत आहे.