गुजरात - कोरोनाचा प्रभाव देशभरात वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी राजीनामा देणार असून केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया पदभार स्विकारतील अशा चर्चा होत्या. मात्र, एका पत्राद्वारे गुजरातमध्ये असे कोणतेही फेरबदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मनसुख मांडविया यांनी या सर्व चर्चांवर गुजरातीत ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे. गुजरात मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली कोरोना विषाणुविरोधात लढत आहे. त्यामुळे ते राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवणे चुकीचे आहे, असे मांडविया यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.
गुजरातच्या स्थानिक माध्यमांनी रुपाणी राजीनामा देणार असून मांडविया त्यांची जागा घेतील, अशा बातम्या दिल्या होत्या. देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक रुग्ण गुजरातमध्ये आहे. सर्वात जास्त बाधित अहमदाबादमध्ये आहे. गुजरातमध्ये रुग्णसंख्या ७ हजारांची संख्या पार केली आहे. तर राज्यात गुरुवारी २९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे.