नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाल्या नाहीत. ते कोमामध्ये असून सध्या व्हेंटिलेटरसपोर्टवर आहेत, असे लष्कर रुग्णालय प्रशासनाने सोमवारी सकाळी सांगितले.
गेल्या 10 ऑगस्टला प्रणव मुर्खजी यांच्या मेंदूमध्ये गाठ आढळल्याने शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत गाठ काढण्यात आली होती. उपचारादरम्यान, मुखर्जी यांना कोरोनाचीही बाधा असल्याचे समोर आले. तसेच त्यांच्या फुप्फुसात संसर्ग असल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालय प्रशासनाकडून त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.
प्रणव मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती आहेत. त्यांनी 2012 त 2017 दरम्यान राष्ट्रपती पद भूषविले होते. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. जवळपास ते 5 दशक भारतीय राजकारणात सक्रिय आहेत.