नवी दिल्ली : दरवर्षी स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी अटारी-वाघा सीमेवर बीटिंग रिट्रीट समारोह जल्लोषात पार पडतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनी हा समारोह होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दलाने याबाबत सोमवारी माहिती दिली.
लोकांनाही नसणार परवानगी..
यापूर्वी मार्चमध्ये या समारोहाला प्रेक्षकांची उपस्थिती असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता हा सोहळाच रद्द करण्यात आला आहे. "यावर्षी प्रजासत्ताकदिनी वाघा-अटारी सीमेवर कोणतीही संयुक्त वा समन्वित परेड पार पडणार नाही. तसेच, याठिकाणी लोकांनाही जाण्याची परवानगी देण्यात येणार नाही." असे बीएसएफने स्पष्ट केले.
स्वातंत्र्यदिनी झाला होता लोकांच्या अनुपस्थितीत समारोह..
गेल्यावर्षी झालेल्या स्वातंत्र्यदिनी याठिकाणी हा समारोह पार पडला होता. मात्र, या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची परवानगी नागरिकांना देण्यात आली नव्हती. बीएसएफच्या केवळ १६ जवानांच्या उपस्थितीत हा समारोह पार पडला होता.
या समारोहाची सुरुवात १९५९मध्ये अटारी-वाघा सीमेवर सद्भावना म्हणून करण्यात आली होती. गेल्या साठ वर्षांपासून याठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्याकडून आपापले ध्वज उतरवण्याची परंपरा सुरू आहे.
हेही वाचा : शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार; संजय राऊतांची मोठी घोषणा