नवी दिल्ली - अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या 'राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट'ची पहिली बैठक आज पार पडली. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांना समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
अयोध्या प्रकरणावर निकाल देत, सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर बांधण्यासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. यावर सरकारने, ५ फेब्रुवारीला ट्रस्टची स्थापना केल्याची घोषणा केली होती. या ट्रस्टची पहिली बैठक आज दिल्लीतील ग्रेटर कैलाश मध्ये असलेल्या कार्यालयात पार पडली. यावेळी महंत नृत्यगोपाल दास यांना समितीचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. तर, चंपत राय यांना ट्रस्टच्या सरचिटणीसपदी नेमण्यात आले. यासोबतच स्वामी गोविंद देवगिरी यांना ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले.
यांच्यासह या बैठकीसाठी गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश कुमार, अनिल मिश्रा, निर्मोही आखाड्याचे धीनेंद्र दास, जोतिष मठाचे शंकराचार्य बासुदेवानंद सरस्वती, धर्मदास जी आणि परमानंद जी महाराज हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर, समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी लोकांच्या भावनांचा आदर राखत मंदिराचे काम लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा : 'डोनाल्ड ट्रम्प म्हणजे काय प्रभू श्रीराम आहेत काय?'