महाराष्ट्राकडून भाजपाने घेतला धडा! 'हे' होणार बिहारचे मुख्यमंत्री, सुशील मोदींची स्पष्टोक्ती - बिहार निवडणूक निकाल
बिहार निवडणुकीमध्ये भाजपाने जास्त जागा जिंकल्यामुळे राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी या चर्चेवर पडदा टाकत, मुख्यमंत्री हे नितीश कुमारच राहणार, असे स्पष्ट केले.

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. एनडीएने मॅजिक फिगर पार करत 125 जागा मिळवल्या आहेत. यात भाजपाने 74, जनता दल (यु) 43 तर हिंदुस्तान आवाम मोर्चा (सेक्युलर) आणि विकासशील इन्सान पार्टीने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाने जास्त जागा जिंकल्यामुळे राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी या चर्चेवर पदडा टाकत, मुख्यमंत्री हे नितीश कुमारच राहणार, असे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील अनुभवानंतर भाजपाने हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यात जनता दल (यु) आणि भाजपाने एकमेकांना सहकार्य करत निवडणूक लढवली आहे. त्यामुळे भाजपाला मिळालेल्या जागेत जदयूचे तर जदयूला मिळालेल्या जागेत भाजापेच योगदान आहे. जागा कमी किंवा जास्त जिंकणे हे समीकरण होतच राहते. ठरवल्याप्रमाणे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीच राहणार आहेत. यात कुठल्याच प्रकारची शंका नाही, असे सुशील मोदी यांनी स्पष्ट केले. लोकजनशक्ती पक्ष हा बिहारमधील एनडीएत राहणार नाही. तर फक्त केंद्रातील एनडीएत राहील, असेही ते म्हणाले.
बिहारमधील निवडणूक मोठी चुरशीची पाहायला मिळाली. महागठबंधन आणि एनडीए यांच्यात सत्तेसाठी शेवटपर्यंत चुरस होती. अखेर एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले. असे असले तरी नितीश कुमार यांच्या जनता दल (यु) चे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा जागा कमी झाल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
कोणाला किती जागा -
बिहारमध्ये एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपाला 74 जागा तर जनता दल (यु) 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा (सेक्युलर) आणि विकासशील इन्सान पार्टीने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने 110 जागांवर विजय मिळवला. यात आरजेडीला 75, काँग्रेस 19, सीपीआय (माले) 12 ,सीपीएम आणि सीपीआयला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत. याचबरोबर एमआयएमला 5 जागा मिळाल्या आहेत. तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला. बहुमतासाठी 122 ही मॅजिक फिगर आहे.
हेही वाचा - बिहारमध्ये एनडीएला काठावरचे बहुमत; तेजस्वी यांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगले