पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा उद्यापासून सुरू होत आहे. अशा स्थितीतही राजकीय फटकेबाजी जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. 'ज्यांना आठ- नऊ मुलं आहेत, त्यांच्याकडून विकासाची काय अपेक्षा करणार', असा खोचक टोला त्यांनी मारला. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांवर हल्लाबोल केला.
काय म्हणाले होते नितीश कुमार
वैशाली जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. 'त्यांना जन्मदराबद्दल काय माहिती आहे? आठ-आठ नऊ-नऊ मुलांना जन्म दिला. मुलींवर विश्वासच नाही. अनेक मुली झाल्यानंतर मुलगा झाला. हे कसला बिहार बनवणार? असे लोक तुमचे आदर्श असतील तर, बिहारची काय अवस्था होईल? कोणीही विचारणार राहणार नाही. काही लोकांसाठी परिवार म्हणजेच सगळं काही आहे, असे नितीश कुमार वैशालीतील महानार येथील रॅलीत म्हणाले.
'नितीश कुमार मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकले'
नितीश कुमारांनी टीका केल्यानंतर आरजेडी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. 'आमच्या आडून नितीशजी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. प्रधानमंत्र्यांना सुद्धा सहा-सात बहीण भाऊ आहेत. आम्ही या आधीही सांगितलं आहे की, नितीश कुमार आता शारीरिक आणि मानसिकरीत्या थकलेत. त्यांना आम्हाला कितीही नावे ठेवू द्या, ते गरीबी आणि बेरोजगारीवर बोलणार नाहीत. ते अशी भाषा वापरत असतील तर, ते महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवत आहेत. नितीश कुमार माझ्या आईच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवत आहेत, असे तेजस्वी यादव म्हणाले.