देहरादून - काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले मेजर विभूती धौंडियाल मंगळवारी पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे डोळे ओलावले होते. इतक्या बिकट परिस्थितीत पत्नी निकिताला पतीसोबत व्यतीत केलेले क्षण आठवून वारंवार डोळे भरून येत होते. निकिता अधूनमधून धौंडियाल यांच्या आठवणी सांगत स्मित हास्य करत त्यांचा अभिमान वाटत असल्याचेही सांगत होती. तिने आपली 'लव्ह स्टोरी' सांगितल्यानंतर तर सर्वांना अश्रू आवरणे कठीण झाले.
निकिता म्हणाली, 'साधारण ४ वर्षांपूर्वी आमची पहिली भेट दिल्लीमध्ये झाली. त्या भेटीनंतर आमच्यात मैत्री झाली. काही दिवसांनंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर विवाहही झाला. लग्नानंतरही तो माझा चांगला मित्र होता. लग्नापूर्वी प्रेम काय असते, एकमेकांची काळजी घेणे या गोष्टींची ओळख झाली. लग्नानंतर तो माझ्यावर अधिकच प्रेम करू लागला. तो माझी खूप काळजी घेत असे.'
त्याने माझे आयुष्य बदलले -
निकिता मूळची काश्मीरची असून अगदी साधी मुलगी आहे. 'तू एका लष्करी अधिकाऱ्याची पत्नी आहेस. तेव्हा तू प्रत्येक प्रसंग, कोणतीही बातमी ऐकण्यास आणि स्वतःला सावरण्यास तयार असले पाहिजेस,' असे तो मला नेहमी सांगत असे. 'त्याच्या शब्दांमुळेच मी खंबीर राहू शकत आहे,' असे तिने सांगितले.